मर्ढेकरी आधुनिक सौंदर्यशास्त्राचा ज्ञानेश्वरीतील आदिबंध
आधुनिक वाङ्मयीन समीक्षेचा एक मोठा दोष असा राहिला आहे की, जेव्हा जेव्हा काव्यातील अमूर्त संकल्पनांची किंवा गूढ सौंदर्यशास्त्राची चर्चा होते, तेव्हा आपले समीक्षक पाश्चात्त्य सिद्धांतांचे संदर्भ शोधू लागतात. 'सिनेस्थेशिया' (Synesthesia) अर्थात इंद्रियव्यत्यय, प्रतिमांची अभेद्यता (Inseparability of Imagery) किंवा 'ऑडिओ-व्हिज्युअल ओव्हरलॅपिंग' यांसारख्या संकल्पना आधुनिक पाश्चात्त्य काव्याची देणगी मानल्या जातात. जेव्हा भारतीय उपखंडाचा विचार होतो, तेव्हा या रचनेचे श्रेय प्रामुख्याने १५ व्या-१६ व्या शतकातील संत कबीरांच्या 'उलटबांसी' काव्यशैलीला दिले जाते. कबीरांचा प्रसिद्ध दोहा 'लाली तेरे लाल की...' हा दृश्यात्मक रंगाने संपूर्ण अस्तित्वाला व्यापून टाकण्याचा एक अप्रतिम नमुना आहे यात शंका नाही. परंतु, या वैचारिक आणि संवेदनात्मक अद्वैताचे मूळ कबीरांच्या कित्येक शतके आधी मराठी संतांच्या प्रतिभेत अत्यंत प्रगल्भ रूपात रुजले होते, या ऐतिहासिक सत्याची मूलगामी मीमांसा होणे गरजेचे आहे.
मराठी काव्यपरंपरेचे आदिबंध असणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याकडे जर आपण केवळ पारमार्थिक दृष्टी न ठेवता, निव्वळ सौंदर्यशास्त्राच्या चष्म्यातून पाहिले, तर तिथे प्रतिमांच्या अभेद्यतेचा परमोच्च बिंदू पाहायला मिळतो. ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात माउली जेव्हा संतांच्या सभेला संबोधित करतात, तेव्हा ते ज्या प्रतिमा वापरतात, त्या निव्वळ उपमा नसून संवेदनेच्या पातळ्या एकमेकांवर ओव्हरलॅप होण्याचे अचूक दाखले आहेत:
अहो हिमकरासी विंजणें । कीं नादापुढें आइकवणें | लेणियासी लेणें । हें कहीं आथी ॥ (ज्ञानेश्वरी, ९.१०)
या ओवीमध्ये 'नादापुढें आइकवणें' हा प्रयोग अत्यंत विचारप्रवर्तक आहे. जो स्वतःच नादस्वरूप आहे, त्याला काय ऐकवणार? इथे नाद (Audio) आणि त्याचे ग्रहण करणारी क्रिया यातील भेदच मिटून जातो. पुढे 'लेणियासी लेणें' (दागिन्यालाच दागिना घालणे) यातून दृश्यात्मक (Visual) एकात्मता साधली आहे. पुढच्याच ओवीत हा इंद्रियव्यत्यय अधिक गहिरा होतो:
सांगा परिमळें काय तुरंबावें । सागरें कवणें ठायीं नाहावें | हें गगनचि आडे आघवें । ऐसा पवाडु कैंचा ॥ (ज्ञानेश्वरी, ९.११)
सुगंधाने स्वतःचाच सुवास घेणे (परिमळें तुरंबावें) किंवा समुद्राने स्वतःच स्वतःमध्ये स्नान करणे, या प्रतिमा केवळ आध्यात्मिक अद्वैत सांगत नाहीत, तर त्या मानवी भाषेच्या आणि संवेदनेच्या परिघ ओलांडून 'Form and Content' (रूप आणि आशय) मधील अभेद्यत्व सिद्ध करतात.
ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायात हा सिद्धांत अधिक स्पष्ट रूपात येतो:
जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणिया आंगचि होय लेणें ।। तेथ अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ।। (ज्ञानेश्वरी, १०.४४)
दागिना अंगाला सजवतो की अंग दागिन्याला, याचे उत्तर देता येत नाही (निर्वचेना). कला आणि तिचा आस्वाद यातील हीच ती अभेद्यता आहे, ज्याला आधुनिक समीक्षेत 'इंद्रियांची सरमिसळ' म्हटले जाते.
हा इंद्रियव्यत्यय केवळ रूपकांपुरता मर्यादित नाही, तर ज्ञानेश्वरांनी सहाव्या अध्यायात योगाभ्यासातून येणाऱ्या अतींद्रिय अनुभूतीचे वर्णन करताना, मानवी इंद्रियांच्या सीमा कशा गळून पडतात आणि ऑडिओ-व्हिज्युअल मर्यादा कशा ओलांडल्या जातात, याचे प्रामाणिक आणि सत्य वर्णन केले आहे:
मग समुद्रापैलीकडील देखे । स्वर्गींचा आलोचु आइके । मनोगत वोळखे । मुंगियेचें ॥ (ज्ञानेश्वरी, ६.२६९)
डोळ्यांनी समुद्राच्या पारचे दृश्य दिसणे आणि कानांनी थेट स्वर्गातील नाद ऐकू येणे, ही संवेदनेची सर्वोच्च अवस्था आहे जिथे अंतर आणि माध्यम (Space and Medium) पूर्णपणे गळून पडतात.
मराठी मातीतील संतांनी संवेदनेच्या ज्या पातळ्यांवर जाऊन लेखन केले, तिथे इंद्रिये केवळ बाह्य जगाचे ज्ञान घेण्याचे साधन उरली नव्हती, तर ती विश्वात्मक जाणिवेशी एकरूप झाली होती. संतांच्या या वाङ्मयीन आणि सौंदर्यशास्त्रीय प्रगल्भतेचे मूल्यमापन केवळ धार्मिक चौकटीत न करता, जागतिक साहित्याच्या सिद्धांतांनुसार करणे हीच आजच्या समीक्षेची खरी गरज आहे.
~ सुधींद्र दि. देशपांडे
Comments