'जगण्यातील उगीचते'च्या अस्वस्थ नोंदी

समकाळातील जगण्याचे पेच शब्दात मांडणे मुळातच कठीण आहे. त्यातही कथेसारख्या साहित्य प्रकारात हे पेच मांडताना, प्रस्थापित चौकट मोडूनही आशयघन अभिव्यक्ती दुर्मिळ झाली आहे. म्हणुनच बालाजी सुतारांचा 'दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी' हा कथासंग्रह मधल्या काळातील ही पोकळी भरून काढणाऱ्या मोजक्या कथासंग्रहांपैकी एक आहे असे म्हणावे लागेल.

सांस्कृतिक उदय व विकासासोबत ग्रामीण रचना बदलत गेली व नगरांची निर्मिती झाली. इंग्रजांच्या आगमनाने आणि काळाच्या परिमाणाने आधुनिकीकरणाने नगरात प्रवेश केला त्यातून ग्रामीण व नागर संस्कृतीचा उदय झाला. १९९० नंतरच्या जागतिकीकरणामुळे, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे दोन संस्कृतीतील हे अंतर कमी झाल्याचा तसेच इंटरनेट क्रांती, सोशल मीडियामुळे नव्या घडामोडींचा केवळ आभास निर्माण झाला. पण याआभासामुळे येणारा बधिरपणा जाणवेनासा झाला. ह्या सगळ्या घुसळणींमधून या दोन शतकांच्या मध्यात केंव्हातरी अर्धनागर संस्कृतीचा उदय होत गेला.
याकाळात घडणाऱ्या सगळ्या बदलांचा ल.सा.वि म्हणून या कथासंग्रहाकडे बघता येईल.

संग्रहातील सर्वच कथांची मांडणी ही कथेच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे, कथनशैलीमध्ये एकचएकपणा नाही त्यामुळे प्रत्येक कथा हा स्वतंत्र अनुभव देवून जाते.
'विच्छिन्न भोवतालाचे संदर्भ' ही पहिलीच कथा वाचकाच्या मनाची पकड घेणारी आहे. ग्रामीण म्हणून अशी एक स्वतंत्र संस्कृती आहे. समूहभाव हा त्याच्या केंद्रस्थानी आहे, पण अर्धनागर संस्कृतीमध्ये ती समूहभाव भावना कमी होत जाते आहे हे 'राघव'ला जाणवणाऱ्या एकटेपणातून अधोरेखित होत जातं.
राघव या कथेचा नायक असूनही नायक नाही, तो भोवतालातल्या असंख्य नायकांचा केवळ प्रतिनिधी आहे. या कथेला शेवट नाही कारण याचा शेवट ही कोण्या एका नव्या राघव, अभिमान आणि त्याची शोकांतिका या जळजळीत वास्तवाची सुरुवात असणार आहे...

'डहुळ डोहातले भोवरे' ही कथा मानसिक आणि नातेसंबंधातील ताण नेमकेपणाने दाखवणारी कथा आहे. हरिश्चंद्र शेकाटे हा नगरपरिषदेत कामाला आहे. त्याची ही नोकरी त्याच्या बायकोच्या मामेभावाच्या वशील्याने मिळाली आहे आणि या जोरावर हा मामेभाऊ आपल्या बायकोशी संबंध ठेवून आहे असं शेकाटेला वाटतं. मुळात प्रत्यक्ष शेकाटे जरी ही कथा सांगत असला तरी त्याची बायकोच शेकाटे, शांताराम अन त्याची मेव्हणी यांच्यामार्फत ही कथा वाचकांना 'सांगते' आहे. आणि वाचकाला ते सांगणं जागोजागी जाणवत राहतं हे या कथेचं आणि पर्यायाने लेखकाचं यश म्हणायला हवं.

'निळ्या चमकदार काळोखातील उप डाऊन्स' ही समकालातील महत्वाची कथा. फेसबुकसारख्या समाज माध्यमांमवरती प्रतिथयश व्यक्ती असतात, प्रसंगी त्या आपले उदात्त नि नैतिक विचार मांडत असतात पण यातील बऱ्याचजणांचे पाय मातीचेच असतात. स्त्रीला केवळ मादी म्हणूनच बघण्याची नजर ही 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते'च्या आदीमकाळापासुन आहे तशीच आहे. कथेत येणारे चित्रा आणि मोहन हे प्रातिनिधिक आहेत इतकंच...
'दोन जगातला कवी', 'पराभवाच्या बखरीतील काही पाने', ' 'दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी', 'अमानवाच्या जात्याचा पाळू', 'संधिकाळातील जहरी प्रहर' या ह्या संग्रहातील आणखी काही दमदार आशयसंपन्न आणि तेवढ्याच अस्वस्थ करणाऱ्या कथा.
या कथांमध्ये 'जगायला बाहेर पडलेली' माणसे आहेत, मुजोर संस्थाचालक नि विनाअनुदानित कॉलेजने करपून टाकलेली  प्राध्यापकांची एक अख्खी पिढी आहे, एकाचवेळी एका जगात कुणबीकीच्या वंशाला जागत शेतकऱ्याचं 'म्हणणं' मांडणारी कविता लिहिणारा कवी आहे तर तोच दुसऱ्या जगात भावकीने जाळलेलं सोयाबीन सुन्नपणे बघणारा कुणबी आहे. भोवतालाचं जळजळीत वास्तव ठळक करणाऱ्या या कथा आपल्याच आजूबाजूला वावरणाऱ्यांच्या आहेत...आपल्याच आहेत!

भाषा ही सामाजिक संस्था आहे, त्यामुळे भाषेवर ती जगत असलेल्या पर्यावरणाचा परिणाम झालेला असतो. या कथांमधील भाषेला मराठवाड्यातील प्रदेशाचे संदर्भ असले तरीही या कथा प्रादेशिक ठरत नाहीत एवढा त्यांचा अवकाश मोठा आहे. बालाजी सुतारांची अभिव्यक्ती ही लोकपरंपरेशी आणि मौखिक परंपरेशी नातं सांगणारी आहे.
या सर्व कथांमध्ये समकाळाचे पेच, ग्रामीण-अर्धनागर संस्कृतीतून लोप पावत जाणारी 'ग्रामीण संवेदनशीलता', अतिगतिमानतेमुळे उभे राहिलेले प्रश्न हे आपल्याकडे रोखून पाहात आहेत, त्याचे उत्तर शोधण्याची जबाबदारी लेखकाने वाचक या नात्याने आपल्यावरती सोडलेली आहे. 
कथासंग्रह जेथे संपतो त्या नवशतकाच्या भयाण दारातच उत्तरांच्या शक्यता शोधण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होते हेच या कथासंग्रहाचे वेगळेपण नि यश..

सुधींद्र दि. देशपांडे  | www.sudhindradeshpande.com


Comments

Popular Posts

एक ऐसा खिलाड़ी, जो मैदान पर अपनी ही नसों से टकराया

आसमाँ है ज़मीन है लेकिन, हर फ़कीरों का घर नहीं होता...!