'जगण्यातील उगीचते'च्या अस्वस्थ नोंदी
समकाळातील जगण्याचे पेच शब्दात मांडणे मुळातच कठीण आहे. त्यातही कथेसारख्या साहित्य प्रकारात हे पेच मांडताना, प्रस्थापित चौकट मोडूनही आशयघन अभिव्यक्ती दुर्मिळ झाली आहे. म्हणुनच बालाजी सुतारांचा 'दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी' हा कथासंग्रह मधल्या काळातील ही पोकळी भरून काढणाऱ्या मोजक्या कथासंग्रहांपैकी एक आहे असे म्हणावे लागेल. सांस्कृतिक उदय व विकासासोबत ग्रामीण रचना बदलत गेली व नगरांची निर्मिती झाली. इंग्रजांच्या आगमनाने आणि काळाच्या परिमाणाने आधुनिकीकरणाने नगरात प्रवेश केला त्यातून ग्रामीण व नागर संस्कृतीचा उदय झाला. १९९० नंतरच्या जागतिकीकरणामुळे, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे दोन संस्कृतीतील हे अंतर कमी झाल्याचा तसेच इंटरनेट क्रांती, सोशल मीडियामुळे नव्या घडामोडींचा केवळ आभास निर्माण झाला. पण याआभासामुळे येणारा बधिरपणा जाणवेनासा झाला. ह्या सगळ्या घुसळणींमधून या दोन शतकांच्या मध्यात केंव्हातरी अर्धनागर संस्कृतीचा उदय होत गेला. याकाळात घडणाऱ्या सगळ्या बदलांचा ल.सा.वि म्हणून या कथासंग्रहाकडे बघता येईल. संग्रहातील सर्वच कथांची मांडणी ही कथेच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आह...