नाहीच कुणी आपले रे, प्राणांवर नभ धरणारे...
प्रिय बाबा,
आज कोजागरी पौर्णिमा, तुझा वाढदिवस म्हणून तुला लिहायला बसलो, खरं तर तुला फोन कॉलच करणार होतो पण, तो काय तुला नेहमीप्रमाणे ऐकायला आला नसता म्हणून हा लेखनप्रपंच.
कोजागरीला म्हणायचास "माझा वाढदिवस सगळं लातूर सिलिब्रेट करतं" आणि मग तेला-पाण्याचा हात केसांवरून फिरवून, गदिमा स्टाईल भांग पाडून.. सगळ्यांना पार्टि देण्यासाठी तुझ्या त्या फेमस कचोरी आणि 'ळभे'चं आंबटगोड पाणी बनवायला घ्यायचास..काय प्रचंड टेस्टी असायचं रे ते!!
आज भेळ खाताना पहिल्याच घासाला ठसका का लागला कोणास ठाऊक...
मी आज असा एकदम एकेरीत बोलतोय म्हणून काही नजरा चपापुन एकमेकांकडे बघत असतील पण तुला त्याचं नक्कीच काही वाटलं नसणार. हो ना!?
तसा मित्रच की तू माझा, अगदी तुझी चप्पल माझ्या पायाला येण्याच्याही आधीपासूनचा...एका हातानं बापपणाचं आभाळ तोलून धरतानाच दुसऱ्या आश्वस्त हातानं मला सावरणारा...
माझ्या मित्रा, आज तुला लिहायला बसलोय खरा पण काय लिहू? कोणत्या मापानं मोजू उंची तुझी? लौकिक व्यवहाराच्या मापानं तुझी उंची मोजणं म्हणजे तुझ्यावर अन्यायच ठरेल आणि तुझ्या उंचीची अलौकिकाची मापं आणायची कोठून?
तुझ्या सभोवताली वावरणाऱ्या लोकांना तुझ्या स्वभावातले निरनिराळे कंगोरे दिसायचे त्यातली जी बाजू त्यांना भावली, आवडली, पटली ती बाजू म्हणजेच तू असं सांगून ते मोकळे झाले पण मला तू असा एका मितीमध्ये कधी दिसलाच नाहीस. जगण्यातील बहूमितींच्या रंगांनी रंगोत्सव साजरा करूनही देवटाक्याच्या पाण्यासारखा स्वच्छ, निर्मळ आणि अलिप्त दिसत आलायस तू मला.
म्हणूनच तू कधी कर्मकांड केल्याचं आठवत नाही. नित्यनेमाने स्नानसंध्यादि नियमही पाळलेस पण त्यासाठी सोवळ्याओवळ्याचा देखावा कधी केला नाहीस, अगदी कोणतंही पाणी तुझ्या हाती गंगोदक होउन जायचं. तुझी आषाढी कार्तिकी वारी कधीच चुकली नाही पण म्हणून मंदिरात दर्शनाच्या रांगेत तू कशी तिष्ठत थांबल्याचं आठवत नाही. तुला तुझा पांडुरंग सापडला तो देगलूरकरांच्या मठातच..
पण मग त्यादिवशी चैतन्य महाराज आले आणि तू उठलाच नाहीस असं पहिल्यांदाच कसं घडलं तुझ्याकडून!?
म्हणजे मग तू फक्त आध्यात्मिक वगैरे होतास का? तसं म्हणावं तर मग संघ, विहिंप सारख्या सामाजिक सेवाभावी संस्थासाठीही तू काम केलंस. पण कोणत्याही एका विशिष्ठ समाजाबद्दल तिरस्कार करताना कधी तुला पाहिलं नाही, कारण कित्येकदा हातातले महत्वाचे खर्च बाजूला ठेवून तू आपल्या 'गुलाब भाईला' ईदसाठी पैसे देऊन नड भागवलीस, 'भाऊ शिखरेला' स्वतःच्या हाताने 'भाजी-कालवण' करून आग्रहाने वाढायचास, दिवाळीच्या सणाला शेतगड्यांच्या मुलांना मी माझ्यासाठी घेतलेल्या फटाक्यांमधले थोडे फटाके दिलेच पाहिजेत हा तुझा कडक दंडक असायचा...नकळतपणेच असा समतेच्या मूल्यांचा जागर करत तू जगत राहिलास, मला नेहमी वाटतं मलाही ह्या मूल्यांविषयी आपुलकी वाटते ती तुझ्यामुळेच, आनुवंशिकपणेच ही मूल्यं माझ्यातही झिरपली असावीत UPSC निमित्त केवळ.
कोणतातरी एक चष्मा लावून तुझ्याकडे बघणं म्हणजे तुझ्या इतर क्षेत्रातल्या कर्तृत्वाचं अवमूल्यन करण्यासारखं आहे.
तू तुकोबा ज्ञानोबाच्या परंपरेतील सच्चा वारकरी होतास, प्रगतशील शेतकरी होतास, देखण्या पत्रावळी द्रोण लावावे ते तूच, शाकंभरी पौर्णिमेला ६० भाज्यांची नावं तुलाच तोंडपाठ असणार, त्या भाज्या चिरुनही देणार तूच, 'देवानंद' आणि 'वहिदा' म्हणजे तुझा विकपॉइंट आणि तुझ्यामुळेच माझाही (देवानंदच्या केसाच्या फुग्याविषयी, दाताच्या फटीबद्दल किती बोलायचो आपण, मला आठवतंय जेंव्हा नवीन लॅपटॉप घेतला तेंव्हा त्यावर पहिल्यांदा आपण 'गाईड' सिनेमा पाहिलेला :) )
स्वयंपाक करण्यापासून ते आंगण झाडून सडा टाकण्यापर्यंत सगळी कामं करताना तूला कधीच कमीपणा वाटला नाही. स्वतःतल्या पुरुषत्वाचा दंभही कधी मिरवला नाहीस म्हणूनच प्रसंगी तुला आईही होता आलं. तुझं कर्तृत्व म्हणजे लांबून बघितलं तर वाटावं की तू मागे खडे फेकत जातोयस आणि प्रत्यक्षात जाऊन बघावं तर एकेक खडा हिमालयाच्या उंचीचा..
बाकी कोणतंही समुपदेशन न घेताही तुला एवढा आदर्श आणि प्रगल्भ पालकत्व कसं काय निभावता आलं हे ही मला न उमजलेलं एक कोडंच आहे कारण, तू कधी मला चार बोटांनी शिवलेलं अजिबात आठवत नाही
दहावी, बारावीला मी येथेच्छ माती खाऊनही तुझा माझ्यावर प्रचंड विश्वास होता, आणि शेवटपर्यंत तो तसाच राहिला.
तसं तर तू सगळ्यांना आपलं मानलंस, त्यांच्या गरजांनुसार धावून गेलास हातातली कामं सोडून, कधी आप-पर भाव मनात ठेवला नाहीस पण लोकं बदलतात हे तुला कधी कळलंच नाही म्हणूनच तर तुझ्या पडत्या काळात कित्येकांनी तुझा उपमर्द केला, बरोब्बर वेळ साधून तुझ्या गरजांकडे दुर्लक्ष केलं पण कोणाहीबद्दल तुझ्या मनात कधीच कडवडपणा आला नाही. कसं जमलं तुला इतकं चांगलं वागणं!! मला जमेल का रे असंच वागायला?
मी माझ्यातच इतका गुंग होतो की कधी तुला तुझ्याबद्दल विचारलंच नाही रे! आणि तुही मनातलं बोललास ते ही शेवटच्या वर्षांत.आधी का नाही बोललास? मी इतकाही लहान नव्हतो रे की काही कळलंच नसतं...एकदा गेलेली वीज अचानक आली आणि तुझ्याकडे बघितलं तर तुझ्या डोळ्यांच्या कडा ओलसर झालेल्या...बघून चर्रर्रर्र झालं होतं आत!! का असं आतल्या आत कुरतडत राहिलास स्वतःच काळीज, इतका परका नक्कीच नव्हतो ना मी!!
बघ ना तुझा माझ्यावरचा विश्वास खरा ठरतोय आताशा, तो खरा ठरणारच होता म्हणा पण तू असायला हवा होतास.. म्हणजे आता तू नाहीस असं नाही; वावरातल्या काळ्या मातीत, गव्हाच्या ओंब्यात, हुरड्याच्या दाण्यात, पावसाच्या पाण्यात, पत्रावळीच्या पानात, नवरात्रीच्या आरतीत, होमाच्या आहुतीत..सगळीकडे अगदी सगळीचकडे तू आहेसच ना. माझ्या सगळ्या जगण्यालाच तुझ्या असण्याचे संदर्भ चिकटून बसलेत रे!
हे तुझं असं आठवणीत असणं नेणिवेच्या पातळीला पोळत्या मनाला निवंविलसुद्धा पण वास्तवाची धग कशी सोसायची सांग ना!!
ऐक ना, येतोस का तू परत?!
मी मनानं अजूनही दिनानाथच्या आय०सी०यू च्या कोरिडॉरमध्येचय रे, उठतोस का तू! मॉनिटरवरची सरळ झालेली रेष मला दिसायच्या आधी उठ ना प्लीज...
कितीतरी गोष्टी करायच्या बाकीयतं आपल्या, आता आपण कोणतीहि कार विकत घेऊ शकतो म्हणजे मग तुला पहाटे साडेपाचच्या एस०टी० साठी धडपडत उठायची गरज नाही..पैश्यावर सूड उगवल्यासारखा खर्च करायचाय आपल्याला. फार त्रास दिलाय त्याने..
वरवर हसतोय मी पण अस्वस्थपणे व्याकूळय रे!!
डोक्यावरचं आभाळ नाहीस झाल्यागत झालंय... घराबाहेर पडलं की आभाळ नसतंच फक्त अंधार असतो...
घराभोवताली फक्त रिकामी जागा असते आता, आतलं आंगण कुठं हरवलंय कोणास ठाऊक...
अशी कोणती घाई झाली होती तुला जायची!?
की साक्षात माऊलींचं- पांडुरंगाचंच बोलावणं आलं म्हणून गेलास..?
पण मग नेमकी कधी वीट फेकायला पाहिजे होती मी त्याच्याकडे, म्हणजे थांबला असता तो किमान काही वर्षांसाठी तरी ? सांग ना!!
माझ्या पांडुरंगा, तू गेलास अन अठ्ठावीस युगांचं एकटेपण धावून आलंय!! तू येशील का परत...प्लीज ये ना!!
तुझाच
सुधींद्र दि. देशपांडे | www.sudhindradeshpande.com

Comments
Wordless
🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you so much!