नाहीच कुणी आपले रे, प्राणांवर नभ धरणारे...
प्रिय बाबा, आज कोजागरी पौर्णिमा, तुझा वाढदिवस म्हणून तुला लिहायला बसलो, खरं तर तुला फोन कॉलच करणार होतो पण, तो काय तुला नेहमीप्रमाणे ऐकायला आला नसता म्हणून हा लेखनप्रपंच. कोजागरीला म्हणायचास "माझा वाढदिवस सगळं लातूर सिलिब्रेट करतं" आणि मग तेला-पाण्याचा हात केसांवरून फिरवून, गदिमा स्टाईल भांग पाडून.. सगळ्यांना पार्टि देण्यासाठी तुझ्या त्या फेमस कचोरी आणि 'ळभे'चं आंबटगोड पाणी बनवायला घ्यायचास..काय प्रचंड टेस्टी असायचं रे ते!! आज भेळ खाताना पहिल्याच घासाला ठसका का लागला कोणास ठाऊक... मी आज असा एकदम एकेरीत बोलतोय म्हणून काही नजरा चपापुन एकमेकांकडे बघत असतील पण तुला त्याचं नक्कीच काही वाटलं नसणार. हो ना!? तसा मित्रच की तू माझा, अगदी तुझी चप्पल माझ्या पायाला येण्याच्याही आधीपासूनचा...एका हातानं बापपणाचं आभाळ तोलून धरतानाच दुसऱ्या आश्वस्त हातानं मला सावरणारा... माझ्या मित्रा, आज तुला लिहायला बसलोय खरा पण काय लिहू? कोणत्या मापानं मोजू उंची तुझी? लौकिक व्यवहाराच्या मापानं तुझी उंची मोजणं म्हणजे तुझ्यावर अन्यायच ठरेल आणि तुझ्या उंचीची अलौकिकाची मापं आणायची कोठून? तु...